जिल्ह्यातील ४६७ गावांत एक गाव एक गणपती

Foto
छत्रपती संभाजीनगर, (सांजवार्ता ब्यूरो) : यंदाच्या गणेशोत्सवात एक गाव एक गणपती या संकल्पनेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे. छत्रपती संभाजीनगर ग्रामीण पोलिसांच्या हद्दीत ग्रामीण भागातील ४६७गावांनी गटबाजी आणि फाटा देत एकोप्याचे दर्शन घडवत ही संकल्पना यशस्वीपणे राबविली आहे.

छत्रपती संभाजीनगर ग्रामीण घटकामध्ये यंदा एकूण १,८३४ सार्वजनिक गणेश मंडळांची स्थापना करण्यात आली होती. यापैकी ४६७ ठिकाणी एक गाव एक गणपती या उपक्रमांतर्गत बाप्पाची प्रतिष्ठापना केली आहे. ग्रामीण भागात अनेकदा सार्वजनिक गणेशोत्सवात मंडळांच्या वाढत्या संख्येवरून, वर्गणीवरून किंवा डिजेच्या आवाजावरून वाद निर्माण होण्याची शक्यता असते. 

एक गाव, एक गणपती या उपक्रमामुळे गावातील अंतर्गत वाद संपुष्टात येण्यास मदत होते. उत्सवावरील अनावश्यक खर्च टळून संपूर्ण गाव एकाच मंडपाखाली एकत्र येते. ग्रामीण पोलिसांकडून गणेशोत्सवापूर्वी घेण्यात येणाऱ्या शांतता कमिटीच्या बैठकांमध्ये जाते. सातत्याने या संकल्पनेला प्रोत्साहन दिले. 

पोलिस अधीक्षक प्रकाश जाधव यांच्या पुढाकारातून यंदाही गावकऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पोलिस दलाने जनजागृती केली. ४६७ गावांनी एकत्र येत या आवाहनाला दिलेली साद ही जिल्ह्यासाठी अत्यंत सकारात्मक आणि दिलासादायक मानली जात आहे.